
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}:“स्वच्छतेचा वसा घेणाऱ्या हातांचा गौरव करूया, समृद्ध आणि स्वच्छ समाजाचा संकल्प करूया,” या भावनेतून शिरूर शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ ‘स्वच्छ समाज’ उपक्रमांतर्गत प्रबोधन व पीपीई किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिरूर नगरपरिषद आणि कॅम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शिरूर नगरपरिषदेच्या श्री. रसिकभाऊ धारिवाल सभागृहात झाला.

यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे म्हणाल्या की, कॅम फाउंडेशन स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे, त्याबद्दल नगरपरिषदेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत शिरूर नगरपरिषदेला मिळालेले यश हे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच शक्य झाले आहे.




सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम करताना स्वच्छता किटमधील साधनांचा वापर करावा तसेच प्रशिक्षणादरम्यान वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. नाल्यांच्या स्वच्छतेसाठी कॅम फाउंडेशन यांच्या वतीने लवकरच सक्शन मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षणाद्वारे सुरक्षित स्वच्छता पद्धती, गटार व सेप्टिक टँक स्वच्छतेतील धोके टाळण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून आरोग्य तपासणी, सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी आणि आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


