महाराष्ट्र
थकीत करासाठी शिरूर नगरपरिषदेची धडक कारवाई; पाच मालमत्ता सील, २६ नळजोडण्या खंडित
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी शिरूर नगरपरिषद प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. करसंकलन विभागाने मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांवर जप्तीची मोहीम तीव्र केली आहे.
या कारवाईअंतर्गत म शहरातील जुना भाजी मार्केट परिसरातील एक दुकान तसेच मारुती आळी येथील चार दुकाने अशा एकूण पाच मालमत्तांना थकीत करापोटी सील ठोकण्यात आले. तसेच दोन ठिकाणच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.
नगरपरिषदेकडून आतापर्यंत सात मालमत्तांवर सीलची कारवाई करण्यात आली असून २६ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्षाअखेरीस थकबाकी वसुलीसाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कारवाईदरम्यान कर निरीक्षक माधव गाजरे, प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ यांच्यासह दीपक कोल्हे, रत्नदीप पालके, तेजस शिंदे, सचिन वाळूज, ज्ञानेश्वर चाकने, आदित्य बनकर, अंकुश इचके, दत्तात्रय टोपे, विकी उमाप, चंद्रकांत पठारे, भूषण कडेकर, भगवान दळवी, अमृत भंवर, रविंद्र जाधव,
स्वप्नील तरटे, संतोष फुलडाळे, संतोष गायकवाड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

थकीत करधारकांनी तत्काळ कराचा भरणा करून जप्ती व अटकावणीसारखी अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले आहे.





