शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर येथील बाबुराव नगर परिसरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय विज्ञान कुतूहल शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक १७ व १८ एप्रिल रोजी पार पडलेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रीय उपकरणांची प्रत्यक्ष निर्मिती करत विज्ञानातील संकल्पना समजून घेतल्या. यामध्ये रोबो, सेन्सरवर चालणारी उपकरणे, सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या, पवनचक्की, जलविद्युत प्रकल्प, दुर्बीण तसेच सौरऊर्जेवर आधारित कारंजे यांसारख्या प्रकल्पांचा समावेश होता. प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा अनुभव घेताना विद्यार्थी विशेष उत्साही दिसून आले.
शाळेतील विज्ञान शिक्षक लवू धारजे आणि सोनाली लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी न्यूटन, आईन्स्टाईन, फॅराडे या महान शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आले. तसेच वनस्पतीशास्त्र विषयावर आधारित बीबीसीचे लघुपट सादर करण्यात आले.
प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड, सर्जनशीलता आणि समूहभावना विकसित होण्यास चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.