महाराष्ट्र
महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कोतवालांना दरमहा किमान १० हजार रुपये पेन्शन मंजूर करावी
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कोतवालांना दरमहा किमान १० हजार रुपये पेन्शन मंजूर करावी, अशी मागणी पुणे जिल्हा सेवानिवृत्त कोतवाल संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मण शहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात सादर देण्यात आलेल्या निवेदनात, राज्यातील कोतवालांनी ३५ ते ४० वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली असूनही त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनची सुविधा उपलब्ध असताना, कोतवालांना त्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कोतवाल हा गावपातळीवरील महत्त्वाचा शासकीय दुवा असून
विविध महसुली व प्रशासकीय कामांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अनेक राज्यांत कोतवालांना पेन्शन दिली जाते; मात्र महाराष्ट्रात सेवानिवृत्त कोतवाल यांना पेन्शन मिळत नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ही मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही करण्यात आली असून, शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शहाणे यांनी व्यक्त केली आहे.



