राजकीयराष्ट्रीय

शिरूर मध्ये राजकीय भूकंप. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजेंद्र पोपटराव गावडे भाजपात दाखल

शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}
शिरूरच्या राजकारणात आज मोठा उलथापालथीचा क्षण पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पोपटराव गावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने तालुक्याच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. या पक्षप्रवेशामुळे शिरूरच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत असून, टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून भाजपची उमेदवारी गावडे यांनाच मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
टाकळी हाजी बेट परिसर हा गेली अनेक दशके गावडे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर माजी आमदार पोपटराव गावडे हे अजित पवार गटात सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी सक्रिय आणि निष्ठावान भूमिका बजावली. राजेंद्र गावडे हेही गेल्या काही महिन्यापासून टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती.
मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि टाकळी हाजी गट शरद पवार गटाकडे देण्याचा निर्णय झाल्यावर गावडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे गावडे समर्थक अस्वस्थ झाले. काल टाकळी हाजी येथे झालेल्या सभेत समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत अन्य पक्षात जाण्याचा आग्रह धरला आणि अखेर आज भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला.
पुण्यातील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष प्रदीप कंद, धर्मेंद्र खांडरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे, संयोगिता पलांडे, भगवान शेळके, अशोक माशेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, शिरूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाबाजी निचित तसेच अनेक गावचे सरपंच, चेअरमन आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
गेल्या ६४ वर्षांपासून टाकळी हाजी जिल्हा परिषद गटावर गावडे कुटुंबाचे एकहाती नेतृत्व राहिले आहे. सलग सुमारे पन्नास वर्षे जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या या कुटुंबातील राजेंद्र गावडे यांचा भाजप प्रवेश म्हणजे शिरूरच्या राजकारणातील एक निर्णायक टप्पा मानला जात आहे. या घडामोडींचा आगामी जिल्हा परिषद निवडणुकांवर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button