धार्मिंकविशेष

साई बाबा की जय’च्या जयघोषात सतरा कमानी पुलावर रंगला नयनरम्य रिंगण सोहळा; पुणे जिल्ह्यातून अहिल्यानगरकडे पालखीचे प्रस्थान

शिरूर:{ डेली न्यूज पोस्ट टीम- 24}”साई बाबा की जय… ओम साईराम…”च्या अखंड जयघोषात शिरूर येथील घोडनदीवरील ऐतिहासिक सतरा कमानी पुलाजवळ साईबाबा पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडले. मानाच्या अश्वाने गोल रिंगण पूर्ण करताच साईभक्तांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, फुगड्या आणि भक्तिगीतांच्या तालावर आनंदोत्सव साजरा केला. रिंगण सोहळ्यानंतर पालखीने सतरा कमानी पूल ओलांडत पुणे जिल्ह्याचा निरोप घेत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केला.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित साईबाबा पालखी सोहळ्याचे शिरूर शहरात आगमन होताच संपूर्ण शहर साईमय झाले होते. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर ठिकठिकाणी गुलाबपुष्पांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. साईनामाचा अखंड गजर, आकर्षक स्वागत कमानी आणि भक्तिमय वातावरणामुळे शहराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

बायपास रस्त्यावरील नमो फर्निचर येथे पालखीचा दुपारचा विसावा झाला. यावेळी अतुल लुंकड व त्यांच्या परिवाराने पालखीचे स्वागत केले. तसेच रमेश धाडीवाल, आदित्य पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद धाडीवाल, निलेश धाडीवाल आदी उपस्थित होते. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी पालखीचे औपचारिक स्वागत केले.

प्रीतम प्रकाश नगर, मंगलमूर्ती नगर, पवार मळा आदी परिसरात आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. विविध सामाजिक संस्था व नागरिकांनी साईभक्तांसाठी पिण्याचे पाणी, फळे, अल्पोपहार व खाद्यपदार्थांचे वाटप केले. पालखी पाबळ फाटा, शिरूर बसस्थानक, जुने नगरपरिषद कार्यालय आणि विद्याधाम प्रशाला मार्गे साई मंगल गार्डन येथे मुक्कामी दाखल झाली. येथे विजय साखला व मित्र परिवाराच्या वतीने स्वागत आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळच्या आरतीसाठी व साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

मंगळवारी सकाळी पालखी शिरूर तहसील कार्यालयासमोरून जोशीवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखीच्या अग्रभागी ढोल-ताशा पथकाचा दणदणाट सुरू होता. सतरा कमानी पुलाजवळ पोहोचताच आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्यांवर नयनरम्य रिंगण सोहळा पार पडला. मानाच्या अश्वाने प्रदक्षिणा घालत रिंगण पूर्ण केल्यानंतर साईभक्तांनी फुगड्या खेळत आणि भक्तिगीतांवर ठेका धरत भक्तीचा अनोखा जल्लोष अनुभवला.

हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने भाविकांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले, तर रासकर परिवाराने सुंदर रांगोळी साकारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

या प्रसंगी मंदार शहाणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, पुणे जिल्हा भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष राजूभाई शेख,,, माजी उपसरपंच गणेश खोले, हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अशोक काळे, अविनाश जाधव, शरद परदेशी, रणजीत गायकवाड, राकेश परदेशी,श्याम परदेशी, सुनील जठार, सिकंदर मण्यार, प्रणव मुसळे, भागचंद पवार, अशोक भोसले यांच्यासह असंख्य साईभक्त उपस्थित होते.

पालखीला निरोप देण्यासाठी अनेक शिरूरकर गव्हाणेवाडीपर्यंत पायी चालत गेले. त्यानंतर गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील साई पॅलेस येथे पालखीचे स्वागत करून भाविकांना अल्पोपहार देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button