राष्ट्रीय
शिरूर नगरपरिषदेचा राज्यस्तरीय “हरित यशोगाथा – 2025” पुरस्काराने गौरव
सर्वांगीण उत्कृष्टता” थीमअंतर्गत उल्लेखनीय कार्याचा सन्मान – मुंबईत पार पडला पुरस्कार सोहळा
शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम- 24}शिरूर नगरपरिषदेने पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIBSF), मुंबई आणि IFAT INDIA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हरित यशोगाथा – 2025” या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात शिरूर नगरपरिषदेला “थिमॅटीक क्षेत्र – सर्वांगीण उत्कृष्टता” या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात शिरूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी श्री. प्रितम पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.
शाश्वत विकास, वातावरणीय बदलांना प्रतिसाद, आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत शिरूर नगरपरिषदेने राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वृक्षारोपण मोहिमा, जलसंधारण, अपारंपरिक ऊर्जेचा वापर तसेच पर्यावरण जनजागृती या क्षेत्रांत परिषदेकडून उल्लेखनीय काम करण्यात आले आहे.



“माझी वसुंधरा” अभियान आणि “स्वच्छ सर्वेक्षण” उपक्रमांत शिरूर नगरपरिषदेने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी राखली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणे या प्रयत्नांचीही प्रशंसा करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना मुख्याधिकारी श्री. प्रितम पाटील म्हणाले, “हा पुरस्कार शिरूर शहरातील प्रत्येक नागरिक आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव आहे. शिरूरला हरित आणि सुंदर शहर बनविण्याचा आमचा संकल्प या पुरस्कारामुळे अधिक दृढ झाला आहे.”




