क्राईम

वाहनांचे टायर चोरणाऱ्या टोळीला अटक; चार आरोपी जेरबंद, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर {डेली न्यूज पोस्ट 24}पिकअप वाहनांचे टायर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले की कारेगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील एका पिकअप वाहनाचे चारही टायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मशस्राम गमनाराम देवासी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात टायर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांनी कौशल्यपूर्ण तपास सुरू केला. शिरूर तालुक्यातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
दरम्यान, पोलीस अंमलदार योगेश गुंड यांना मिळालेल्या खबऱ्याच्या माहितीनुसार आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील चार जण इरटिगा वाहनातून येऊन पिकअप वाहनांचे टायर चोरत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणातूनही आरोपी याच भागातील असल्याची खात्री झाल्यानंतर तपास पथकाने वाघोली परिसरात सापळा रचून चारही आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे —
१) अक्षय रूस्तुम राठोड (२८), रा. माळवाडी रोड, आव्हाळवाडी, ता. हवेली
२) तुषार लक्ष्मणराव दामेकर (२३), रा. लाईन गल्ली, देगनूर, ता. देगलूर, जि. नांदेड
३) करण सुभाष राठोड (२३), रा. ब्राह्मणवाडा, औंढानागनाथ, ता. औंढा, जि. हिंगोली
४) सुनील गंगाधर भोसले (२५), रा. वाधी, जि. नांदेड अशी आहेत.
तपासादरम्यान आरोपींनी रांजणगाव एमआयडीसीतील गुन्ह्यासह शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत  वाहनांचे टायर चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरी केलेले १४ पिकअप वाहनांचे टायर तसेच गुन्ह्यात वापरलेली इरटिगा कार असा एकूण १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button