क्राईम
शिरूरमधून उलगडले अंमली पदार्थांचे जाळे; १०.७ किलो मेफेड्रोन जप्त, पोलीस हवालदारासह पाच जण अटकेत
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरातील एका गॅरेज चालकाच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहाराचा धागा उलगडत पुणे ग्रामीण पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पसरलेले मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.
या कारवाईत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल १० किलो ७०७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी), दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एक आरोपी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील कार्यरत पोलीस हवालदार असल्याचे उघड झाले आहे.
भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैध अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस ठाण्याने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
दि. १७ जानेवारी रोजी शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार दि. १८ जानेवारी रोजी बाबुरावनगर परिसरात सापळा रचण्यात आला. या छाप्यात शादाब रियाज शेख (वय ४१, व्यवसाय गॅरेज चालक, रा. डंबेनाला, शिरूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो ५२ ग्रॅम मेफेड्रोन व दुचाकी जप्त करण्यात आली.
शादाब शेख याच्या चौकशीतून अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्ञानदेव ऊर्फ माऊली शिंदे, ऋषीकेश चित्तर (दोघे रा. कुरुंद, ता. पारनेर) व महेश गायकवाड (रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा) यांची नावे पुढे आली. या तिघांकडून आणखी ९ किलो ६५५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान हा साठा शामसुंदर विश्वनाथ गुजर (वय ३९, रा. नेप्ती, ता. नगर) याने पुरविल्याचे निष्पन्न झाले. गुजर हा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून स्थानिक गुन्हे शाखेतील मुद्देमाल कक्षातून एनडीपीएस गुन्ह्यांतील अंमली पदार्थ काढून त्याची विक्री केल्याचा प्राथमिक तपासात उघड झाला आहे.
सर्व आरोपींविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना दि. २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल् अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
शिरूर पोलीस स्टेशनचे पो.नि. संदेश केंजळे, स्था.गु.शा. चे सपोनि कुलदीप संकपाळ, सपोनि दत्ताजीराव मोहिते, सपोनि महादेव शेलार, पोसई अभिजीत सावंत, शिक्रापूर पो स्टे चे श्रेणी पोसई पंडीत मांजरे, शिरूर पो स्टेचे पोसई गोविंद खटींग, पोलीस मुख्यालयाचे पो.कॉ. पोपट गायकवाड, स्था.गु.शा.चे अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीण, निलेश शिंदे, राहुल पवार, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, समाधान नाईकनवरे, भाउसाहेब पुंड, सचिन घाडगे, धिरज जाधव, अजित भुजबळ, आसिफ शेख, दिपक साबळे, अक्षय नवले, संदिप वारे, हनुमंत पासलकर, तुषार भोईटे, अमोल शेडगे, मंगेश भगत, गणेश धनवे, बाळासाहेब खडके, नितीन सुद्रीक, बाळू भवर, निरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.

