शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आण्णापूर (ता. शिरूर) येथील भोलाई माता मंदिराच्या पाठीमागील परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल विकी पंडित मैंद (ब.नं. ३२३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. ४ मे) दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आण्णापूर गावाच्या हद्दीत भोलाई माता मंदिराच्या पाठीमागे आरोपी रम्मी नावाचा जुगार ५२ पत्त्यांच्या केंटवर खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या प्रकरणी अझर शाबुद्दीन पठाण, लारा गव्हाणे, केशव मोहन चौधुले, राजू मारुती पवार, विठ्ठल बबन पवार व दिलीप भाऊ कुरंदळे (सर्व रा. आण्णापूर, ता. शिरूर) या ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच संबंधितांनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनास्थळावरून पोलिसांनी दोन पत्त्यांचे संच, रोख १,४०० रुपये तसेच अॅपल कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ३६,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०२/२०२६ अंतर्गत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करीत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.