‘
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने कारेगाव (ता. शिरूर) येथे ‘ड्रग्जमुक्त गाव’ या अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री कारेश्वर मंदिर सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी उपस्थितांना अंमली पदार्थांच्या व्यसनाचे शारीरिक, मानसिक व आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगत तरुण पिढीला या
विळख्यातून दूर ठेवण्याचे आवाहन केले. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी ड्रग्जच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम आणि समाजावर
होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन या समस्येच्या समूळ उच्चाटनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अशोक साबळे यांनी केली. या उपक्रमात पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास आबा कोहकडे, अॅड. हिरामण गावडे, डॉ. संदीप बच्छाव, डॉ. डफळ, ग्रामविकास अधिकारी किसन बिबे, पृथ्वीराज नवले, हणमंत शेवाळे यांच्यासह सरपंच, सदस्य, डॉक्टर, मेडिकल व हॉटेल व्यावसायिक, दक्षता समिती सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘ड्रग्जमुक्त गाव’ करण्याची सामूहिक शपथ घेतली. भाऊसाहेब नवले यांनी आभार मानले.



