राष्ट्रीय
एका मुलीचे शिक्षण म्हणजे समाजाच्या भविष्याची गुंतवणूक’; श्रावणी गर्ल्स स्कॉलरशिपमधून ५३ विद्यार्थिनींना शिक्षणाची नवी उभारी
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाची स्वप्ने अपुरी राहू नयेत, या उद्देशाने हीलिंग लाईव्ह फाउंडेशनच्या वतीने ‘श्रावणी गर्ल्स स्कॉलरशिप–२०२६’ अंतर्गत ५३ गुणवंत व गरजू विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. शिरूर येथील माई नगरी, बोऱ्हाडे मळा येथे झालेल्या या कार्यक्रमात शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना सक्षम करण्याचा आणि समाजपरिवर्तनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला हीलिंग लाईव्हच्या संस्थापिका जानी विश्वनाथन, शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, मदर ग्लोबल फाउंडेशनचे विनय सपकाळ व सीमा सपकाळ, वात्सल्य सिंधू संस्थेच्या उषा वाखारे व आश्विनी नरवडे, हीलिंग लाईव्हच्या अहिल्यानगर विभाग प्रमुख दीपाली आढाव, तुषार पाचुंदकर, माजी उपसरपंच गणेश खोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हीलिंग लाईव्हचे महाराष्ट्र प्रमुख संतोष सांबारे म्हणाले, “एका मुलीचे शिक्षण म्हणजे संपूर्ण समाजाच्या भविष्याची गुंतवणूक आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही ५३ गुणवंत व गरजू विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे.”
संस्थापिका जानी विश्वनाथन यांनी मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन करताना सांगितले, “प्रत्येक महिला ही सर्जनशील शक्ती आहे. शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. अडचणींवर मात करत ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हीलिंग लाईव्ह कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. जीवन सोपे नसते; ते आपल्या प्रयत्नांनी सोपे करावे लागते.”
नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी हीलिंग लाईव्ह आणि मदर ग्लोबल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, “माणुसकी जपण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे काम या संस्था करत आहेत. प्रत्येक विद्यार्थिनीने शिक्षणाच्या बळावर स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहावे,” असे आवाहन केले.
विनय सपकाळ यांनी श्रावणी गर्ल्स शिष्यवृत्ती मुलींचे भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनींनीही आपल्या भावना व्यक्त करत या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिवानी बनकर हिने, “या शिष्यवृत्तीमुळे माझे शिक्षण पूर्ण करून भविष्यात गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मीही योगदान देईन,” अशी भावना व्यक्त केली.
वैष्णवी जाधव हिने, “ही केवळ आर्थिक मदत नसून आमच्या स्वप्नांना मिळालेले बळ आहे,” असे सांगितले. मयुरी कांबळे, मंजिरी कांबळे आणि आर्या बोऱ्हाडे यांनीही संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमात संजनाजी , विजय पाचंगे आणि सीमा सपकाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निकिता तळेकर यांनी केले.


