विशेष

शिरूरचे प्रवासी नकोत’… एसटी वर आरोप; सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा

शिरूर,{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: पुणे येथून शिरूरमार्गे विदर्भ, मराठवाडा आणि अहिल्यानगरकडे धावणाऱ्या काही राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून शिरूरच्या प्रवाशांना प्रवास नाकारला जात असल्याच्या तक्रारींनी पुन्हा डोके वर काढले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मागील आठवड्यात पुण्यातील येरवडा एसटी बसथांब्यावर शिरूरला जाण्यासाठी उभे असलेल्या सामाजिक कार्यकर्ते रुपेश घाटगे यांच्यासह काही प्रवाशांना चालक-वाहकांनी “शिरूरचे प्रवासी बसमध्ये घेणार नाही,” असे सांगत बसमध्ये चढू दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पुणे-अहिल्यानगर मार्गावरून विदर्भ आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बस शिरूर शहरातील बसस्थानकात न जाता थेट बायपास मार्गाने धावत असल्याने शिरूरच्या प्रवाशांना प्रवासाची संधी मिळत नसल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे. परिणामी, बसस्थानकावर तासन्तास प्रतीक्षा करूनही बस न मिळाल्याने अनेकांना जीव धोक्यात घालून खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

शिरूर हे विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. या मार्गावर दररोज सुमारे ७०० हून अधिक एसटी बसची ये-जा होते. मात्र, त्यापैकी अनेक बस शहरात न शिरता पुणे-नगर बायपास मार्गाने जात असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे एसटी महामंडळालाही संभाव्य महसुलापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

रांजणगाव आणि सुपा येथील औद्योगिक वसाहतींमुळे पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरीही काही बस चालक-वाहक केवळ मार्गातील ढाब्यांवर थांबण्यासाठी प्रवासी न घेण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे.

या प्रश्नावर गेल्या काही वर्षांत अनेक आंदोलने झाली असली, तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. पुण्याकडून शिरूर, सुपा आणि अहिल्यानगर तसेच नगरकडून सुपा, शिरूर व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना नियमितपणे बसमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी प्रवाशांकडून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहरप्रमुख संदीप कडेकर यांनी सांगितले की, “ज्या बसला चालक आणि वाहक उपलब्ध आहेत, त्या प्रत्येक बसने शिरूर बसस्थानकात येणे अपेक्षित आहे. प्रवाशांनी बसमध्ये चढून तिकीटाची मागणी करावी. वाहकाने तिकीट देण्यास नकार दिल्यास संबंधित आगारप्रमुखांकडे तातडीने तक्रार करावी.”

दरम्यान, शिरूरकरांच्या या प्रश्नावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना आणि नागरिकांना एकत्र घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रुपेश घाटगे, प्रितेश फुलडाळे आणि डॉ. वैशाली साखरे यांनी दिला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या या प्रश्नावर राज्य परिवहन महामंडळ कोणती भूमिका घेते, याकडे आता शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

खेळाडू व शिक्षिका अनिता भोगावडे यांना डेली न्यूज पोस्ट -२४ चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button