Uncategorizedमहाराष्ट्र
शहरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद व शिरूर पोलीस स्टेशन यांच्यात विशेष बैठक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष आढावा बैठक घेण्यात आली.
या अनुषंगाने शिरूर नगरपरिषद कार्यालयात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीत शहरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्ते मोकळे ठेवण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येणार असल्याचे केंजळे यांनी सांगितले.
शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात आला. सध्या शहरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, नगरपालिका प्रशासनाने नवीन प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर संपूर्ण शहर सीसीटीव्ही कव्हरेजखाली आणण्याचा मानस आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि अतिक्रमण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानुसार कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.





