राष्ट्रीय

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून निष्ठा, दूरदृष्टी आणि मनाची खंबीरता हे गुण आत्मसात करावेत,”

प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}“छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक असून त्यांच्या जीवनातून निष्ठा, दूरदृष्टी आणि मनाची खंबीरता हे गुण प्रत्येकाने आत्मसात करावेत,” असे प्रतिपादन प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष तथा शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, शिरूर यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना’ या विषयावर निकम यांचे प व्याख्यान झाले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, ज्येष्ठ नेते पांडुरंग थोरात, समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

निकम म्हणाले, “कर्तव्यापुढे कोणताही धर्म नसतो. ध्येय गाठायचे असेल तर नियोजनबद्ध पद्धतीने, धाडसाने आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पुढे जाण्याची वृत्ती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखी आहे.” स्वराज्य उभारणीच्या कार्यात महाराजांनी अचूक नियोजन, परिस्थितीनुरूप बदल स्वीकारण्याची तयारी आणि सहकाऱ्यांवरील विश्वास या गुणांच्या जोरावर इतिहास घडवला, असे त्यांनी सांगितले.

निकम यांनी सुरत लूट, अफजलखान वध आणि शाहिस्तेखानवरील हल्ला या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत महाराजांच्या रणनीतीची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. “प्रत्येक मोहिमेत वेगळी युक्ती, वेगळी रणनीती आणि परिस्थितीचा अचूक अभ्यास हेच त्यांच्या यशाचे गमक होते. एकच युक्ती पुन्हा न वापरण्याची दूरदृष्टी त्यांच्यात होती,” असे ते म्हणाले.

“शिवाजी महाराज हे लढवय्ये नेते होते. त्यांची खरी ताकद त्यांच्या मनाच्या खंबीरतेत आणि माणसं ओळखण्याच्या गुणात होती. योग्य संगत आणि सक्षम सहकाऱ्यांची निवड हे त्यांच्या यशामागील महत्त्वाचे सूत्र होते,” असेही निकम यांनी अधोरेखित केले.

आजच्या पिढीने चांगली संगत ठेवून ध्येयवादी वृत्ती जोपासावी, नैतिक अधिष्ठान बळकट करावे आणि काळानुसार बदल स्वीकारत पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केले, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था उभारली आणि न्यायनिष्ठ नेतृत्व दिले.यातूनच खऱ्या अर्थाने आदर्श नेतृत्वाची ओळख मिळते, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र धनक यांनी केले. निकम यांचा परिचय डॉ. प्रा. क्रांती पैठणकर यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन दिलीप शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button