Uncategorized

शिरूरमध्ये ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाऊस

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
शिरूर शहरात आज संध्याकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान अचानक मुसळधार पाऊस कोसळला. अनपेक्षित आलेल्या या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट झाली.
दिवसभर शहरात उकाडा आणि प्रचंड गरमी जाणवत होती. दुपारच्या सुमारासही पावसाच्या काही सरी आल्याने वातावरणात बदल झाला होता. मात्र रात्रीच्या मुसळधार पावसामुळे  व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांचे मोठे हाल झाले.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असते. शहराच्या आसपासच्या गावांतील शेतकरी फुले विक्रीसाठी शिरूरमध्ये आले होते. रस्त्यावरच फुलांचा ठेला व पथारी मांडून विक्री सुरू असताना आलेल्या पावसाने विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे फुलांची नासधूस झाली आणि भावात घसरण होऊन फुल उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
दिवाळीच्या निमित्ताने पूजेकरिता लागणाऱ्या मातीच्या मूर्ती, लक्ष्मी-घोडेस्वार, पणत्या, तसेच बच्चे कंपनीसाठी किल्ल्यावरील शोभेच्या वस्तू विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांनाही पावसाचा फटका बसला. कपडे, भेटवस्तू आणि दिवाळी साहित्य विक्रीसाठी स्टॉल लावणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले.
लक्ष्मीपूजनानिमित्त शहरातील अनेक ठिकाणी सजावट, रोषणाई आणि रांगोळ्या करण्यात आल्या होत्या. मात्र रात्रीच्या जोरदार पावसाने या रांगोळ्या आणि सजावट पाण्यात वाहून गेल्या. ऐन पूजनाच्या दिवशी झालेल्या या पावसाची सर्वत्र चर्चा होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button