राष्ट्रीय

अर्धा किलो वजन… पण जीवाची प्रचंड जिद्द’ — वात्सल्य हॉस्पिटलने दिला नवजात साईला नवा श्वास

शिरूर,{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}.— जन्मावेळी वजन फक्त ५१६ ग्रॅम… अवयव अर्धवट विकसित… प्रत्येक क्षण धोक्यात. अशा परिस्थितीत या नवजात बाळाचा जीव वाचविणे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील अक्षरशः अतुलनीय विजय. वात्सल्य हॉस्पिटलचे डॉ. प्रसन्ना बिहाणी व डॉ  संदीप गुंड यांनी अखंड परिश्रम, तज्ज्ञ उपचार आणि संवेदनशील देखभालीच्या बळावर या बालकाला नवजीवन दिले. तीन महिन्यांच्या काळजीपूर्वक उपचारानंतर बाळाचे वजन आता १ किलो ६०० ग्रॅम झाले आहे.

ओपीडीमध्येच सहाव्या महिन्यात प्रसूती

अहिल्या नगर जिल्ह्यातील अर्चना बापू अकोलकर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पुण्याकडे हलविण्यात येत होते. मात्र रस्त्यातच प्रकृती बिघडल्याने शिरूरमधील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तातडीच्या परिस्थितीत ओपीडीमध्येच सहाव्या महिन्यात प्रसूती झाली.

जन्मावेळी बाळाचे वजन अवघे ५४० ग्रॅम, पुढे ते ५०० ग्रॅम पर्यंत घटले.

तब्बल ४० दिवस कृत्रिम जीव रक्षक प्रणालीवर

कमी वजनाच्या नवजात बालकांचे जगण्याचे प्रमाण अत्यल्प. फुफ्फुसांची वाढ अपूर्ण, दूध न पचणे, शरीरातील अवयव कमजोर—प्रत्येक दिवस आव्हानात्मक.

या बालकाला तब्बल ४० दिवस कृत्रिम जीव रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. दररोज १०-१० ग्रॅम वजन वाढत गेले आणि हाच या बाळाचा जीवन देणारा आशेचा धागा ठरला.

भावस्पर्शी क्षण : ‘साई’ला समारंभपूर्वक डिस्चार्ज

तीन महिन्यांच्या अखंड प्रयत्नांनंतर साईची प्रकृती स्थिर झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये अनोखी आनंदाची लहर.

प्रवेशद्वार फुलांनी आणि फुग्यांनी सजले, आकर्षक रांगोळीची पायघड्या, बाळासाठी नवे कपडे, आईसाठी नवी साडी—अगदी माहेरहून सुनेची पाठवणी करावी तसा हा भावनांचा सोहळा.

साईच्या डिस्चार्ज दिवशी सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. तीन महिन्यांपासून हॉस्पिटलचा ‘लाडका साई’ असलेल्या या बाळाच्या निरोपावेळी अनेकांच्या नजरा पाणावल्या.

आई अर्चना अकोलकर म्हणाल्या—

“डॉ. बिहाणी व डॉ. गुंड आमच्यासाठी देवदूत आहेत. जशी आई माहेरात काळजी घेते तशीच काळजी इथल्या सर्वांनी घेतली. आज मला आणि माझ्या साईला जणू माहेराहून पाठवणी केली जातआहे.”

डॉक्टरांची कर्तव्यपूर्ती आणि समाधान

डॉ. बिहाणी  व डॉ गुंड म्हणाले—

“कमी वजनाच्या बाळांचे जगण्याचे प्रमाण कमी असते. परंतु योग्य वेळी उपचार मिळाले तर धोका टाळता येतो. आई-वडिलांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि स्टाफची मेहनत—यामुळेच साईला नवजीवन देता आले.”

डॉ. प्रसन्ना बिहाणी, डॉ. अनुराधा बिहाणी, डॉ. संदीप गुंड आणि संपूर्ण नर्सिंग व वार्ड स्टाफचा या यशात मोठा वाटा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button