धार्मिंकमहाराष्ट्रविशेष

‘हरे कृष्ण’च्या अखंड जयघोषात शिरूर नगरी भक्तिरसात न्हाली; इस्कॉनची भव्य श्रीजगन्नाथ रथयात्रा उत्साहात

oplus_131074

शिरूर, { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: “हरे कृष्ण, हरे कृष्ण… कृष्ण कृष्ण, हरे हरे… हरे राम, हरे राम… राम राम, हरे हरे…” या अखंड हरिनामाच्या गजराने बुधवारी शिरूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. इस्कॉन शिरूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य श्रीजगन्नाथ रथयात्रेला शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दिव्य रथाचे दर्शन घेत भक्तिभावाने सहभागी झाले.

रथयात्रेचा प्रारंभ शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालय परिसरातून झाला. दुपारी १ वाजता भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथाचे पूजन व आरती करून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर, सर्वलक्षण प्रभू, गिरीवरधारी प्रभू, गोमती प्रभू, महावीराय प्रभू तसेच खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती शरद कालेवार, भरत कालेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हरिनाम संकीर्तन, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिगीतांच्या सुरावटींनी संपूर्ण रथयात्रा भक्तिरसात रंगली. राम मंदिर (सुभाष चौक), सोनार आळी, कुंभार आळी, मुंबई बाजार, आयडी बाजार, कापड बाजार, रामआळी, विद्याधाम कॉर्नर, निर्माण प्लाझा, सेंटर दवाखाना आणि इंदिरा गांधी पुतळा मार्गे रथयात्रा नगरपरिषद कार्यालयापर्यंत पोहोचली. मार्गभर भाविकांनी रथाचे दर्शन घेत पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

सायंकाळी कीर्तन-भजनाचा भक्तिमय कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भगवानांना ५६ भोग अर्पण करण्यात आले. सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला.

इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या प्रेरणेने आयोजित या सोहळ्याने शिरूरमध्ये भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button