अपघात

भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू तिघेजण गंभीर जखमी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. १६ फेब्रुवारी २०२६) रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मौजे आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथील थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात झाला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button