क्राईम
खंडाळा माथा तिहेरी हत्याकांडाची उकल; पोलिसांना ‘सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण’ पुरस्कार
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
खंडाळा माथा ता. शिरूर परिसरात वर्षभरापूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण करत आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर करणाऱ्या पोलिसांना ‘सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीदरम्यान प्रदान करण्यात आला.
खंडाळा माथा येथे एका अनोळखी महिलेचा व तिच्या दोन लहान मुलांचा निर्घृण खून करून मृतदेह अर्धवट जाळलेल्या अवस्थेत आढळले होते. कोणताही ठोस पुरावा नसताना या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र, तांत्रिक तपास, बारकाईने केलेली चौकशी आणि सातत्यपूर्ण
पाठपुरावा यांच्या जोरावर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली. संबंधित आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून दोषारोपपत्र शिरूर न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे , हवालदार अक्षय नामदेव यादव (यवत), पोलीस शिपाई महादेव साळुंखे (सुपा), सुमित वाघ (उरुळी कांचन) आणि विलास आंबेकर (रांजणगाव) यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र), पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर) तसेच विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

या यशस्वी तपासामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलाची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
