राष्ट्रीय

मांडवगण फराटा येथे किसान सभेचे जिल्हा अधिवेशन; शेतकरी प्रश्नांवर होणार मंथन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हास्तरीय दहावे त्रैवार्षिक अधिवेशन येत्या ९ मे रोजी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे होणार असून, राज्यातील विविध शेतकरी प्रश्नांवर या अधिवेशनात व्यापक चर्चा होणार आहे.

भारतातील शेतकरी चळवळीला ऐतिहासिक परंपरा लाभली असून, १९३६ साली स्थापन झालेल्या किसान सभेने विविध प्रश्नांवर सातत्याने लढे उभारले आहेत. स्वामी सहजानंद सरस्वती, हरकिशन सिंह सुरजीत, एस. रामचंद्रन पिल्ले यांसारख्या नेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर किसान सभेचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्रातील क्रांतिसिंह नाना पाटील आणि गोदावरी परुळेकर यांनीही राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले होते. सध्या डॉ. अशोक ढवळे हे राष्ट्रीय अध्यक्ष, तर डॉ. अजित नवले हे राज्य सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला रास्त भाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, दुधाला हमीभाव, पीकविमा, सिंचन, वीज, अन्याय्य भूमी अधिग्रहण यांसारख्या विविध प्रश्नांवर किसान सभेने राज्यभर आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, मावळ आदी भागांमध्ये मागील तीन वर्षांत किसान सभेने विविध प्रश्नांवर संघर्ष उभारले. विशेषतः हिरड्याच्या नुकसानभरपाईसाठी चार वर्ष चाललेल्या लढ्यामुळे सुमारे १५ कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांना मिळाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. तसेच हिरड्याच्या खरेदी व हमीभावाच्या प्रश्नावरही किसान सभा सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सांगण्यात आले.

या अधिवेशनाचे उद्घाटन किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. उमेश देशमुख करणार असून, समारोप राज्य सरचिटणीस कॉ. अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर, माकपचे पुणे जिल्हा सचिव कॉ. गणेश दराडे तसेच सामाजिक कार्यकर्ते रविंद्र धनक उपस्थित राहणार आहेत.

किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, ॲड. नाथा शिंगाडे, राजू घोडे, महेंद्र थोरात, दत्तोबा बर्डे, अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी, आमोद गरुड, संतोष कांबळे, विकास भाईक, डॉ. मंगेश मांडवे, नंदाताई मोरमारे, कृष्णा वडेकर, रामदास लोहकरे, बाळासाहेब शिंदे, किसनराव ठाकूर आणि संदीप भांगरे यांनी अधिवेशनाची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button