२८ जून रोजी शिरूरमध्ये माजी सैनिकांचा ऐतिहासिक महामेळावा; मंत्री शंभूराज देसाई करणार मार्गदर्शन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: महाराष्ट्रातील माजी सैनिक, वीरनारी आणि सैनिक परिवारांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी २८ जून रोजी शिरूर तालुक्यातील करडे येथे भव्य सैनिक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा मेळावा महाराष्ट्रातील सैनिक चळवळीला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
‘माजी सैनिक किसान एकता शिखर संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि ‘भारतीय माजी सैनिक संघ, शिरूर तालुका’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महामेळावा रविवार, २८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान करडे येथील भैरवनाथ लॉन्स अँड मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
‘एक सैनिक, एक परिवार, एक दिशा’ या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात राज्यातील विविध माजी सैनिक संघटनांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच उपस्थित संघटनांच्या अध्यक्षांना व प्रतिनिधींना मुक्तपणे आपली मते आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
माजी सैनिकांचे हक्क, त्यांचे कल्याण, शासकीय योजनांचा लाभ तसेच शेतकरी माजी सैनिकांसमोरील विविध प्रश्नांवर या मेळाव्यात सविस्तर चर्चा होणार आहे. राज्याचे सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई माजी सैनिकांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या व अपेक्षांबाबत संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने (महाप्रसाद) होणार असून राज्यभरातील माजी सैनिक, वीरनारी आणि सैनिक कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“विचारवैविध्य जपत एकतेच्या भावनेने सर्व सैनिक बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. हा महामेळावा महाराष्ट्रातील सैनिक संघटनांना एकत्र आणून भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल,” असे मत माजी सैनिक किसान एकता शिखर संघाचे राज्याध्यक्ष शिवाजी अण्णा कदम यांनी व्यक्त केले.
शिरूर तालुक्यात प्रथमच होत असलेल्या या भव्य सैनिक महामेळाव्याकडे राज्यातील माजी सैनिकांचे लक्ष लागले आहे.