शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}”महामानवांनी दिलेल्या समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा अंगीकार करून जीवनाची वाटचाल करा. आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्राधान्य द्या, कारण शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे,” असे आवाहन शिवव्याख्याते शरद दरेकर-पाटील यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वात्सल्य सिंधू फाउंडेशन आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ नगर येथे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमास शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे आणि वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या सुनंदा लंघे,उषा वाखारे, माजी नगरसेविका माया गायकवाड, जनाबाई मल्लाव, शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे , श्रुतिका झांबरे अश्विनी नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दरेकर-पाटील म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवून सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडवून आणली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. अनाठायी खर्च टाळून शिक्षण, कौशल्यविकास आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी खर्च करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, “जीवनात स्पष्ट ध्येय आणि दूरदृष्टी ठेवून काम केल्यास यश निश्चित मिळते. शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, विचारशक्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.”
नगराध्यक्षा पाचर्णे यांनी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील असे सांगितले.
माया गायकवाड यांनी या परिसरात वाचनालय सुरु करण्याची मागणी केली.यावेळी प्रास्ताविक उषा वाखारे यांनी केले. त्यात त्यांनी वात्सल्यय सिंधू फाउंडेशनचा वतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर कार्यक्रमातून झाला.