गुन्हेगारी

एका रात्रीत दोन चोरीच्या घटना; किराणा दुकान फोडून रोखीसह माल लंपास, शेळ्या-बोकडांचीही चोरी

शिरूर, दि. (डेली न्यूज पोस्ट टीम 24}): शिरूर तालुक्यात एका रात्रीत घडलेल्या दोन स्वतंत्र चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाबुराव नगर येथील किराणा दुकान फोडून रोख रकमेसह सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला, तर टाकळी हाजी परिसरात गोठ्यातून दोन शेळ्या व चार बोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत बाबुराव नगर, टॉवर लाईन रोड येथील शिवकृपा सुपर मार्केटचे मालक अनिल पांडुरंग लोंढे (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. १९ जुलै रोजी रात्री १० ते २० जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर खाद्यतेल, सुकामेवा, बिस्किटे, कॅडबरी आदी किराणा मालाचे बॉक्स तसेच गल्ल्यातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७२/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार जगताप तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत टाकळी हाजी येथील उचाळेवस्ती परिसरातील सौ. अर्चना गणेश मुसळे (वय ३५) यांच्या घराशेजारील गोठ्यातून दोन शेळ्या (पाट) आणि चार बोकड चोरीला गेले. १९ जुलै रोजी रात्री १० ते २० जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून सुमारे ४८ हजार रुपयांचे पशुधन चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७३/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार बनकर पुढील तपास करीत आहेत.

सलग घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे शिरूर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button