महाराष्ट्र
शिरूर पोलीस ठाणे जुन्या इमारतीतील पोलीस ठाणे नवीन इमारतीत स्थलांतराची प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना
शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीतील दयनीय अवस्थेची राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी तातडीने दखल घेत नवीन इमारतीत स्थलांतराची प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा व्हिसलब्लोअर निलेश वाळुंज यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही कार्यवाही सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
निलेश वाळुंज यांनी ८ जुलै रोजी शिरूर पोलीस ठाण्यातील एका कक्षामध्ये पावसाचे पाणी गळत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करत ही बाब शासन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या परिस्थितीमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अडथळे निर्माण होत
असून महत्त्वाची शासकीय कागदपत्रेही धोक्यात येत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.
या तक्रारीची पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी तातडीने दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना आवश्यक सूचना दिल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यानंतर त्याच दिवशी शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीची पाहणी केली. यानंतर स्थलांतराच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाल्याची माहिती मिळाली असल्याचे वाळुंज यांनी सांगितले.
शिरूर पोलीस ठाण्याचे नवीन इमारतीत लवकरात लवकर स्थलांतर व्हावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. सध्याच्या घडामोडींमुळे ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चौकट
जनहिताच्या प्रश्नावर तत्पर प्रतिसाद-
जनहिताच्या प्रश्नावर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी तातडीने दखल घेत कार्यवाहीसाठी सूचना दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी समाधान व्यक्त केले आहे. जनहिताशी संबंधित इतर प्रलंबित प्रश्नांवरही प्रशासन याच संवेदनशीलतेने कार्यवाही करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.






